बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे. ठाण्यातील शिळफाटा येथे मनसे कार्यकर्त्यांनी बुलेट ट्रेनसाठी सुरु असलेली जागेची मोजणी बंद पाडली आहे. जागेची मोजणी सुरु असताना मनसे कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत जागेची मोजणी बंद पाडली. कार्यकर्त्यांनी जागेची मोजणी करण्याची मशीनच फेकून दिल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पालघरमध्ये सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनविरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला होता. मुंबई व पालघर जिल्हा महाराष्ट्रापासून तोडून गुजरात राज्याला जोडण्याचे कारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी बोईसर येथे बोलताना केली होता. पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी वेळीच जागे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.

बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग,कारिडॉर या प्रकल्पांच्या माध्यमातून पालघर जिल्हा गुजरातशी जोडून गिळंकृत करण्याचा कुटील डाव आखला जात आहे. मुंबईदेखील गुजरातशी जोडण्यासाठी तसेच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडले जाईल असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिळफाटा येथे आंदोलन केलं आहे. दरम्यान जागेची मोजणी आता सुरु राहणार की तात्पुरती बंद करण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही. जागेची मोजणी पूर्ण झाल्यास कार्यकर्ते अजून आक्रमक होण्याची शक्यता आहे.