राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्घीकरण प्रकल्पाच्या विरोधकांमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी झाली आहे. तालुक्यातील सागवे येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणामध्ये अशा स्वरूपाचे कमालीचे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याच्या शासनाच्या धोरणावर टीका करत मनसे या लढय़ामध्ये प्रकल्पग्रस्तांबरोबर अखेपर्यंत राहील, अशी हमी दिली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची ‘कानउघाडणी’ करण्याचे आश्वासन दिले.
कोकणी माणूस कोणत्याही प्रकल्पाला प्रथम विरोध करतो, पण पशाचा लोभ, दबाव किंवा अन्य काही कारणांमुळे हळूहळू तो ढिला पडत जातो, या इतिहासाकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले आणि या वेळी तरी तसे होऊ न देण्याची तंबी दिली.
मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थितांपैकी काही ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त करताना प्रकल्पाला ठाम विरोध असल्याचे सांगितले.राज यांची आक्रमक वक्तृत्वशैली लक्षात घेता, या ठिकाणी ते सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडतील, अशी उपस्थितांपैकी अनेकांची असलेली अपेक्षा मात्र त्यांनी फोल ठरवली आणि केवळ प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देत अवघ्या सात-आठ मिनिटांत भाषण आटोपले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 3:28 am