एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विचारला आहे. औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी करत जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली. यावरुन अमेय खोपकर यांनी ट्विटरला पोस्ट टाकत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे –
“एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ? संभाजीनगरमध्ये लॉकडाउन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर आहे असं असताना असा जल्लोष करताना, नाचताना शऱम वाटायला पाहिजे,” अशी टीका अमेय खोपकर यांनी केली आहे.

“हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे व्हायरस वेळीच ठेचायला हवेत. करोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,” अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- “…मानसिक तयारी ठेवा”, राजेश टोपेंचा राज्यातील जनतेला इशारा

नेमकं काय झालं?
औरंगाबादेत ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू होणार होती. ३१ मार्चपूर्वी हीच टाळेबंदी ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार होती. त्यात सोमवारी अंशतः बदल करत ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी टाळेबंदीचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले. यानंतर इम्तियाज जलील समर्थकांसोबत मिरवणुकीत सहभागी झाले होते.

लॉकडाउनविरोधात इम्तियाज जलील यांनी ३१ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडीनेही विरोध दर्शवला होता.