गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करुन त्यांना मारहाण करण्याऐवजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सीमारेषेवर जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना मारावे, असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर टीका केली आहे. प्रामाणिकपणे पैसे कमावणाऱ्या फेरीवाल्यांना मारहाण केल्यास मनसैनिकांविरोधात माझे भीमसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराच त्यांनी दिला.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे पूल आणि परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. शनिवारी १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला, ठाणे, घाटकोपर, कल्याण अशा विविध ठिकाणी फेरीवाल्यांना हुसकावून लावले होते.

मनसेच्या या आंदोलनावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या या आंदोलनाचा मी निषेध करतो. फेरीवाल्यांबाबतचे धोरण तयार करण्याचे काम प्रशासन आणि सरकारचे आहे. फेरीवाल्यांनी कुठे बसावे आणि कुठे नाही हे मनसेचे कार्यकर्ते ठरवू शकत नाही. फेरीवाल्यांमध्ये फक्त परप्रांतीयच आहेत असं देखील नाही. मराठी भाषिक फेरीवालेही आहेत, असे आठवलेंनी सांगितले. प्रामाणिकपणे पैसे कमावणाऱ्या फेरीवाल्यांना मारहाण करण्याचा अधिकार मनसैनिकांना नाही. मनसेने दादागिरी सुरु ठेवल्यास फेरीवाल्यांसाठी भीमसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराच त्यांनी दिला. आगामी गुजरात निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेच्या आंदोलनावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील टीका केली होती. मुख्यमंत्री मनसेला पाठिशी घालत असून मनसेची ही कारवाई निषेधार्ह आहे. मनसेने घातलेल्या धिंगाण्याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला होता.