राज्याला बुधवारी निसर्ग चक्रीवादळानं तडाखा दिला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मार्गे हे चक्रीवादळ पुढे सरकले. या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं असून, सुदैवानं कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. निसर्गच्या निमित्तानं आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं.

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निसर्ग चक्रीवादळ निर्माण झालं. बुधवारी सकाळपासून या वादळाचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू झाला. दुपारी दीड वाजता निसर्ग चक्रीवादळानं जमिनीला स्पर्श केला. ताशी १२० किमी वेगानं आलेल्या या वादळामुळे कोकण किनारपट्टीला तडाखा दिला. अनेक ठिकाणी घराची पडझड झाली, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. “कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. महाराष्ट्रा, काळजी घे,” असं ट्विट मनसेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

अमित ठाकरेंनी केलं होतं आवाहन; ‘निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात माणुसकी सोडू नका’

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही नागरिकांना आवाहन केलं होतं. त्यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो,

करोना संकटावर मात करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतानाच आणखी एक नवं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलंय. हे संकट आहे, चक्रीवादळाचं.

या चक्रीवादळाच्या अतिवेगवान वाऱ्यामुळे गरीब आणि बेघर लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. फक्त माणसांनाच नव्हे तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, रस्त्यावरच्या प्राण्यांना तुमच्या इमारतीच्या आवारात आश्रय घेऊ द्या, त्यामुळे ते सुरक्षित राहतील. मला पूर्ण कल्पना आहे की, अनोळखी लोकांना इमारतीत घेणं आपल्यापैकी अनेकांना शक्य होणार नाही. पण एकदा का हे चक्रीवादळाचं संकट निघून गेलं की, आपण सर्वांनी घराबाहेर पडून गरजूंना मदत करायला हवी. कुणाला जेवण, तर कुणाला औषधं उपलब्ध करुन द्यायला हवी.

एक जबाबदार नागरिक म्हणून या संकटकाळात आपल्याला जे काही मदतकार्य करणं शक्य असेल ते आपण करायला हवं.

मला विश्वास आहे की, आपला एक लहानसा प्रयत्नही एखाद्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतो.