राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या भ्रष्टाचारावर जाहीर सभांमधून कडाडून टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील महापौरपदाच्या निवडणुकीत याच दोन पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्यासाठी आपला पक्ष कोणतीही तडजड करू शकतो, हे दाखवून दिले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मनसेचे अशोक मुर्तडक शुक्रवारी महापौरपदी विराजमान झाले. अशोक मुर्तडक यांना ७५ मते पडली तर त्यांच्या विरोधात असलेल्या महायुतीच्या सुधाकर बडगुजर यांना ४४ मते पडली. माकपचे दोन आणि अन्य एक असे तीन नगरसेवक मतदानावेळी तटस्थ राहिले. उपमहापौरपदी अपक्ष नगरसेवक गुरमीत बग्गा यांची निवड झाली.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर लोकसभा निवडणुकीत जोरदार हल्ला चढवला होता. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याच ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत वाटाघाटी करून मनसेच्या उमेदवाराला आघाडीचा पाठिंबा मिळवला. नाशिक महापालिकेतील या नव्या समीकरणांमुळे राज्यात नव्या तडजोडींची नांदी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापौर, उपमहापौरपद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी स्थानिक पातळीवर विलक्षण घडामोडी घडल्या. सकाळी काँग्रेस व राष्ट्रवादीची बैठक झाल्यावर या पक्षाच्या नेत्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या वेळी जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येण्यावर चर्चा झाली. युतीला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु, महापौरपदावर मनसे आणि राष्ट्रवादी या दोघांनी दावा सांगितला. या संदर्भातील निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आला. या सर्व घडामोडींविषयी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय सावध भूमिका घेत स्पष्टपणे बोलण्याचे टाळले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी अशोक मुर्तडक यांच्या नावाची महापौरपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली.