लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्यांलाही करोनाचा संसर्ग झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. या माहितीनंतर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालं आहे. पण कार्यकर्त्यांना चिंता करण्याचं कारण नाही. कारण करोनाची बाधा झालेल्या सुरक्षा रक्षकांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे.

मनसे एका पदाधिकाऱ्याने लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. या तिन्ही पोलिसांनी करोनावर मात केली आहे. हे तीन पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता करोनामुक्त झाले आहेत.

आणखी वाचा- “महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहे की…”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. पण करोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारं जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलं आहे.

आणखी वाचा- धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण

ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला संसर्ग
ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.