News Flash

राज ठाकरेंचा ‘आंध्र पॅटर्न’, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत घरोबा नाहीच

राज ठाकरे हे आंध्र प्रदेशमधील वायएसआर रेड्डी यांचे अनुकरण करतील, असे सांगितले जाते. 

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीत मनसेला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मनसेने मात्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून राज ठाकरे हे वायएसआर काँग्रेसचे अनुकरण करतील, असे वृत्त आहे. आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी कोणासोबतही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवत सत्ता काबीज केली होती.

लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी राज ठाकरे यांनी उमेदवार उभा केला नव्हता. राज ठाकरे यांनी निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचारसभा घेत अप्रत्यक्षपणे महाआघाडीला मदत केली होती. मात्र, यानंतरही महाआघाडीला राज्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. राज ठाकरेंनी ज्या भागांमध्ये सभा घेतली त्या भागातही आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत सामील करुन घेण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसने नमते घेतले आहे. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस तयार झाली असून काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाआघाडीने मनसेसाठी २० ते २५ जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याची चर्चाही आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवतील, अशी शक्यता आहे. राज ठाकरे हे आंध्र प्रदेशमधील वायएसआर रेड्डी यांचे अनुकरण करतील, असे सांगितले जाते. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५० जागा जिंकून जगनमोहन रेड्डी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे जगनमोहन हे पुत्र असून काँग्रेस नेतृत्वाकडून खच्चीकरण करण्यात आल्याने जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस सोडून नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनी निवडणुकीपूर्वी कोणत्याही पक्षासोबत युती करणे टाळले. त्यांनी राज्यभरात पक्षाचा प्रचार केला आणि निवडणुकीत घवघवीत यश मिळवले.

राज्यात राज ठाकरेही अशीच कामगिरी करतील, असा दावा मनसेमधील नेत्याने केला आहे.  राज्यात सरकारविरोधात लाट असली तरी विरोधी पक्ष म्हणून एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरुन काढण्याचे राज ठाकरेच करु शकतात, असा दावा मनसेमधील सूत्रांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:20 pm

Web Title: mns chief raj thackeray alliance with ncp congress assembly election andhra pradesh ysr congress
Next Stories
1 सोलापूरमधील ठेवीदारांना गंडा, बसपाच्या माजी आमदाराला अटक
2 कन्यादानानंतर शेतकरी पित्याची आत्महत्या
3 अमित शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल – उद्धव ठाकरे
Just Now!
X