सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दणका देताना आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सीव्हीसीचा आदेश रद्द केला, त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू होणार आहेत. दरम्यान, यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकाला आपआपली जागा दाखवली अशा आशयाचं मोदी सरकारला बोचणारं व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढलं आहे.


या व्यंगचित्रात आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ‘या वर्माजी बसा’ असं म्हणत असून त्यांना सीबीआय संचालकाच्या खुर्चीवर बसण्याची विनंती करताना दाखवण्यात आलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्मा यांच्या फेरनियुक्तीला विरोध करत असल्याचं दाखवण्यात आलं असून न्यायाधीशांच्या निर्णयानंतर मोदी केवळ न्यायाधीशांकडे आ वासून पाहात असल्याचं दिसतंय.

सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर गेल्यावर्षी 23 ऑक्टोबरला सरकारने दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं. आलोक वर्मांच्या याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाल्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठानं निर्णय राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाने आलोक वर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांना त्याच्या मूळ पदावर जाण्याचाही मार्ग मोकळा झालाय.याचसोबत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मोदी सरकारसाठी मोठा दणका मानला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत केंद्र सरकारचा हा निर्णय रद्द केला. पण, सर्वोच्च न्यायालयाने आलोक वर्मा यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, तसंच ते चौकशीची जबाबदारीही सांभाळू शकणार नाहीत, असंही आपल्या आदेशात म्हटलंय.