मनसेला आलेल्या अपयशाबद्दल अनेकदा अनेक लोक चर्चा करत असतात. त्यांना एक सांगतो की एकदा माझ्या चपलांमध्ये पाय घालून हा पक्ष चालवून दाखवा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या १४ वर्षांपासून माझ्या पक्षाचा प्रवास सुरु आहे. माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीकाही केली. पण हे चालणारच. जे टीकाच करतात त्यांचा फार विचार करु नका असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गेल्या दहा वर्षात मनसेने जेवढी आंदोलनं केली तेवढी इतर कोणत्या पक्षाने केली? असाही प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी विचारला. ज्या काँग्रेस पक्षाने ५०-६० वर्षे देशावर राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाची आजची अवस्था बघा काय आहे. १४ वर्षांच्या काळात मनसे या पक्षाचे १३ आमदार निवडून आले, नगरसेवक निवडून आले. हेच प्रश्न आम्हाला विचारले जातात तुमचे १३ आमदार निवडून आले होते, इतके नगरसेवक निवडून आले होते. मग पुढे काय झालं? काँग्रेस पक्षाची आजची स्थिती बघा काय झाली आहे? दिल्लीत निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. एवढंच नाही तर ६३ आमदारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही. भाजपाची वाटचाल सध्या अशीच सुरु आहे.

काही काही लाटा येतात तेव्हा अनेक पक्षांना फटका बसतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मायवतींच्या पक्षाचा एकही खासदार निवडून आला नाही. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षालाही फटका बसला. याबद्दल कुणीही चर्चा करत नाही. असल्या लाटा आल्या की अनेक पक्षांना फटके बसतात. आज अनेक राज्यांमध्ये भाजपाचंही नुकसान होतं आहे. गेले काही महिने, काही वर्षे पक्षाला जे अपयश येतं आहे त्यावर चर्चा होते. एकदा माझ्या जागी येऊन, माझ्या चपलेत पाय घालून पक्ष चालवून दाखवा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.