शिवजयंतीच्या वेळी हा झेंडा आपण बाहेर काढायचा असं सहा वर्षांपूर्वीच मनात होतं. गेल्या वर्षभरापासून आपण बदल केला पाहिजे असं माझ्या मनात होतं. आत्ताची परिस्थिती आणि झेंड्याचा रंग याची सांगड घालण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. मात्र हा निव्वळ योगायोग आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा आणायचा होता तो मी सगळ्यांसमोर ठेवला असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. तो हाती घ्याल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या वेळी हा झेंडा वापरायचा नाही. त्यावेळी पक्षचिन्ह असलेला झेंडा वापरायचा असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

येत्या ९ मार्चला १४ वर्षे पूर्ण होतील असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाषणच्या सुरुवातीलाच झेंडा आवडला का? हा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. त्याला सगळ्या उपस्थितांनी हो असं उत्तर दिलं. सोशल मीडियाबाबत काही प्रतिक्रिया व्यक्त केली जातात. यापुढे फेसबुक किंवा ट्विटरवर कोणतीही वाईट प्रतिक्रिया आलेली मला चालणार नाही असंही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. मला असे काही प्रकार आढळले तर संबंधित व्यक्तीला पदावरुन बाजूला करेन असंही राज ठाकरे यांनी जाहीर केला. एखादा जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष असतो बऱ्याचदा सारख्या वयाचे असतात. मात्र पद नावाची गोष्ट आहे ज्याचा मान तुम्हाला राखावाच लागेल. जे उत्तम काम कराल तेच सोशल मीडियावर पोस्ट करा असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

मनसेच्या अधिवेशनासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली. पत्रकारांचीही आपल्याला चांगली साथ मिळाली. ती यापुढेही देतील अशी अपेक्षा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यशाला बाप खूप असतात आणि अपयशाला सल्लागार खूप असतात या आपल्या वाक्याचा राज ठाकरेंनी आज पुनरुच्चार केला.

मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईतील नेस्को मैदानावर सुरु आहे. या मैदानावरच्या भाषणात राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. राज ठाकरे आज काय बोलणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून शिगेला गेली होती. सध्या अधिवेशांची परंपरा कमी होत चालली आहे म्हणून हे अधिवेशन भरवण्यात आलं. अनेक ठराव यावेळी मांडण्यात आले ही अतिशय चांगली बाब आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुढीपाडव्याला आपली सभा असणार आहे असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.