सोशल मीडियासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली आहे. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.

यापुढे पदाधिकाऱ्यांनी फेसबुक, टि्वटरवर पक्षांतर्गत विषय मांडल्याचे  आढळले तर, त्या व्यक्तीला मी पदावरुन दूर करेन असे राज ठाकरे म्हणाले. चांगल्या गोष्टी तुम्ही निश्चित सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी सांगितले.

वेगवेगळया भागातील शहरध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची वय सारखी असली तरी पद नावाची गोष्ट आहे त्याचा मान तुम्हाला राखवाचा लागेल. यापुढे सोशल मीडियावर तुमच्या कमेंटस दिसता कामा नये असे राज ठाकरेंनी बजावले.

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे

मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही असे राज म्हणाले.

जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झालE. ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते असे राज म्हणाले.