कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आक्रमक भूमिका घेतली. हजारो कोटी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जातात. पण तरीही रस्त्यांची दुर्दशा का होते?, हजारो कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालायला दिले जातात का? असा सवाल विचारतानाच या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. कोकणातील रस्त्यांवरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले जातात तरीही रस्त्यांची दुर्दशा का?, यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाल तेव्हा ह्या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारावा, असे त्यांनी सांगितले.

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता हातात असताना तिथे जे रस्ते बांधले गेले ते अजूनही खड्डेविरहित आहेत. का? कारण कंत्राटदारांना तशी तंबी देऊन ठेवली होती, असे त्यांनी नमूद केले.

सणानिमित्त कोकणातील गावी जाताय. सुखरूप जाऊन या. प्रवास करताना इतर कुणी अडचणीत असेल तर मदत करा. गावोगावी असलेल्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले.