मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. ‘विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी परभणीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात थापा मारणारे मुख्यमंत्री असून इतकं खोटे बोलणारे सरकार बघितलेच नव्हते. केंद्र व राज्यात या दोन्ही ठिकाणी आजपर्यंतचे सर्वात खोटे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. राजकीय खेळात राज्यातील तरुणांना अडवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर चांगले करावे, पण उर्वरित महाराष्ट्रात का विकास करत नाही, महाराष्ट्राचा पैसा वापरुन वेगळा विदर्भ करण्याचा यांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.   मराठवाड्याला अनेक मुख्यमंत्री मिळाले. मात्र, या भागाचा अपेक्षित विकास होऊ शकलेला नाही, असंही ते म्हणालेत. मराठवाड्यानंतर विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना हा गोंधळलेला पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दुर्दैवी असून आत्महत्येने प्रयत्न सुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया अंगलट आल्याने त्यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण १० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे यंदा आषाढी पूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. सोमवारी सकाळी पंढरपूरमध्ये मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली.