लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सुमारे १५ मिनिटे या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

राज ठाकरे यांनी मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे यापूर्वीच जाहीर केले आहे. मंगळवारी रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे सूचक विधान त्यांनी केले होते. या मेळाव्यानंतर बुधवारी सकाळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून जवळपास १५ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच, अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे समजते. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहे. शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली मुलाखत असो, एकत्र केलेला विमान प्रवास असो किंवा अजित पवारांनी महाआघाडीत मनसेला सामील करण्याबाबत घेतलेली भूमिका असो, मनसे आणि राष्ट्रवादीमधील जवळीक वाढताना दिसत आहे. यात भर म्हणजे मनसेने लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले असून ते राष्ट्रवादीला पाठिंबा देणार की काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे.