मनसेला मार खाणारे नको, तर मार देणारे कार्यकर्ते हवे असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी घेऊन येऊ नये, उलट चोपल्यामुळे इतरांनी तुमच्याबद्दल तक्रारी करायला हव्यात, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

नाशिक महापालिकेतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी प्रथमच नाशिकचा दौरा केला. नाशिकमधील विश्रामगृहात त्यांनी समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनीही त्यांची व्यथा राज ठाकरेंसमोर मांडली. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून सरकार दबाव तंत्र वापरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर चोपडा लॉन्स येथे राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. गेल्या काही वर्षांत मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्याने खचून न जाता प्रत्येकाने नव्या जोमाने काम करणे आवश्यक आहे. मनसेची ताकद विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये नसून रस्त्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येतात म्हणून चमकोगिरीसाठी आंदोलने करू नयेत. सोशल मीडियावर नाहक वेळ वाया घालवू नये. राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर अभ्यास करून आंदोलने करावीत, अशा कानपिचक्याही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

…म्हणून मोदी समर्थकांची टिवटिव बंद
केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर सोशल मीडियावर मोदीभक्तांचे वर्चस्व होते. पंतप्रधानांविरोधात एक पोस्ट टाकली की ‘भक्त’ समोरच्यावर तुटून पडायचे. मात्र आता महागाईमुळे या भक्तांची कोंडी झाली आणि म्हणून त्यांची समर्थकांची टिवटिव बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.