21 April 2019

News Flash

भारतमाता पुन्हा ओवाळणार नाही; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

२०१४ मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. या मालिकेतील सहावे व्यंगचित्र भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त काढलेल्या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. २०१४ मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. या मालिकेतील सहावे व्यंगचित्र भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे. यात मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर २०१४ मधील आश्वासनं आणि २०१८ मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

२०१४ मध्ये मोदींनी ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळेपैसेवाले पकडणार, अशी आश्वासनं दिली. पण २०१८ उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून सुचवायचे आहे.

२०१८ मध्ये राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याची टीका व्यंगचित्रातून करण्यात आली. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. निवडणूक आयोगाचीही गळचेपी केली जात असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे. हे सारे पाहून ‘गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, असे विचार भारतमातेच्या मनात आल्याचे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

First Published on November 9, 2018 7:44 am

Web Title: mns chief raj thackeray mocks bjp narendra modi in cartoon