शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला फटकारले आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्र ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली. तर महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर व्यंगचित्र पोस्ट केले असून या व्यंगचित्रातून त्यांनी शिवसेनेला फटकारले आहे.
मुंबईच्या महापौरांना जिजामाता उद्यान येथे घर देण्यात आल्याच्या बातमीचा दाखला व्यंगचित्रात देण्यात आला असून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात दाखवण्यात आले आहे.एक महिला आपल्या मुलाला घेऊन राणीच्या बागेत आली असून महापौरांच्या पिंजऱ्याजवळ येताच ती महिला मुलाला सांगते की, बाळा, त्यांना खायला घालू नकोस, ते आपल्या मुंबईचे महापैर आहेत.

राज ठाकरेंनी यांनी गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा व्यंगचित्राद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र शिवसेनेच्या जिव्हारी लागण्याची चिन्हे असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर १७ नोव्हेंबर २०१५ रोजी तृतीय पुण्यतिथीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्ट स्थापन करून वर्षभरात महापौर बंगल्यातील स्मारकाचे काम पूर्ण होईल, असेही जाहीर केले होते. मात्र, अजूनही स्मारकाचे काम सुरु न झाल्याने ठाकरे नाराज झाले होते. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खूश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या पुण्यतिथी दिनी १७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray mocks shiv sena mumbai mayor in cartoon rani baug
First published on: 09-11-2018 at 13:22 IST