काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सध्याचे सरकार बेकार असल्याची बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मोदींवरील रागामुळे तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारीच हरतात, असे सांगत लोकसभा निवडणुकीतही मोदी सरकारचे धोरणच भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कॉम्प्यूटर वा मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यांत साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी जारी केली. यावरुनही राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. मोदींना लोकांच्या घरात घुसून पाहायचं असेल तर पाहावं. लोक त्यांना शिव्या घालतात हे तरी कळेल, आधी लोकांचे पैसे काढले आता घरात घुसून पाहणार का?, असा सवाल त्यांनी विचारला. जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं सरकारच्या चुकांचं प्रमाण वाढेल, नोटाबंदी हा नरेंद्र मोदींनी स्वत:साठी खणलेला खड्डा होता, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. भाजपा आधी पायावर फावडा मारेल, मग कुदळ मारतील, दोन्ही एकाच वेळी मारणार नाही, असे सांगत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाही हे स्पष्ट केले. जानेवारीमध्ये पुन्हा एकदा नाशिक दौरा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कांदा उत्पादुकांना दिलेल्या अनुदानावरही त्यांनी टीका केली. सरकारच्या तिजोरीत पैसा नसताना अशा घोषणा का केल्या जातात?, पैसा नसताना कशाच्या जोरावर कांद्याला अनुदान जाहीर केले, असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला. नाशिक दौऱ्यात नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या गर्दीवरुन जनतेचा शिवसेना-भाजपवरील विश्वास उडाल्याचं दिसते, असेही त्यांनी सांगितले.