कुणीतरी म्हटलं की कोकणातील काही राजकीय लोकं चेटूक वगैरे करतात. कुठल्या जगात आपण वावरतोय, असे काही नसते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. जर चेटूक वगैरे काही असेल तर दुसऱ्या पक्षातील लोकांवर करा, असे त्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

मनसे कोकणवासियांच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शनिवारी मार्गदर्शन केले. कोकणातील अंधश्रद्धेवरुन ते म्हणाले, कुणीतरी म्हटलं की कोकणातील काही राजकीय लोकं चेटूक वगैरे करतात. कुठल्या जगात आपण वावरतोय. जर हे चेटूक वगैरे काही असेल तर ते दुसऱ्या पक्षातील लोकांवर करा, असे त्यांनी सांगितले. लहानपणी आजोबांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्याला कसा धडा शिकवला होता, याचा किस्साही त्यांनी सांगितला. हा किस्सा ऐकल्यावर सभागृहात हशा पिकला.

महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कोकणासारख्या भूमीवर परकीयांच आक्रमण होतंय. आमचीच लोकं त्यांना जमिनी विकत आहेत. एकदा का जमीन हातातून गेली की तुमचं अस्तित्व संपलं, असे त्यांनी सांगितले. शिवछत्रपती किती द्रष्टे होते, ३५० वर्षांपूर्वी त्यांनी सांगून ठेवलं होतं की, “आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावर लक्ष ठेवा.” त्यादृष्टीने आरमार उभारलं. आपण दुर्लक्ष केलं. त्यानंतर आता मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, हल्लेखोर समुद्रमार्गेच आले होते, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला आपल्याच भूमीचं महत्त्व कळालेलं नाही. महाराष्ट्राला ८ भारतरत्न मिळाली आहेत. त्यापैकी ७ भारतरत्न ह्या कोकणपट्ट्यातील आहे. त्यातील ४ भारतरत्न तर फक्त दापोलीतील आहे. असे कित्येक लेखक, खेळाडू, चित्रकार, संपादक, पत्रकार या भूमीने दिलेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.