News Flash

‘मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण द्यावे’

राज्यातील इंग्रजी शाळा बंद कराव्यात, या ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या मतास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.

| November 30, 2014 07:27 am

राज्यातील इंग्रजी शाळा बंद कराव्यात, या ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या मतास मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. इंग्रजी शाळा बंद करण्याची गरज नाही. त्याऐवजी इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण दिले जावे आणि मराठी शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी भाषेचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी सध्या राज हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने शनिवारी त्यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी पुन्हा संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना इंग्रजी शाळांविषयी नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या मतावर राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मराठी शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी भाषेचे शिक्षण दिल्यास पालक पाल्यास इंग्रजी शाळांमध्ये पाठविणार नाहीत. काही इंग्रजी शाळा स्वत:ला ‘इंटरनॅशनल’ म्हणून संबोधतात, त्याचा अर्थ आजपर्यंत कळलेला नाही. इंग्रजी शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करणे गरजेचे असून सरसकट या शाळा बंद करणे हा पर्याय होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत जे झाले ते सोडून नव्याने मनसेची पुनर्रचना केली जाणार आहे. पक्ष संघटनेत बदल केले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देणारे माजी आमदार वसंत गीते यांच्याबद्दल काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. विधानसभा निवडणुकीत पराभवाची काही कारणे लक्षात आली. या चुका पुन्हा होणार नाहीत. पुढील अडीच वर्षांत नाशिकला उद्यानांचे शहर म्हणून ओळख प्राप्त करून दिली जाईल. खासगी संस्था व कारखान्यांच्या मदतीने उद्याने विकसित केली जाणार असल्याचे राज यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील विकासकामांचा बोजा महापालिकेवर टाकला जात आहे. वास्तविक हा केवळ नाशिकचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा उत्सव आहे. यामुळे राज्य शासन व केंद्र शासन या दोघांची ती जबाबदारी आहे. संबंधितांनी पालिकेला अधिकाधिक निधी देणे गरजेचे आहे. पालिका सध्या ‘डिफर्ड पेमेंट’मधून रस्त्यांची कामे करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिकच्या दौऱ्यात राज यांचा मुलगा अमितही सहभागी झाला होता. तो राजकारणात प्रवेश करणार काय, यावर राज यांनी तो चांगला फुटबॉलपटू असून भविष्यात त्याला काय करायचे याचा निर्णय तो स्वत: घेईल असे नमूद केले. दरम्यान, राज यांनी गोदा पार्क, फाळके स्मारक व पेलीकन पार्क येथेही भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2014 7:27 am

Web Title: mns chief raj thackeray on marathi and english school rew
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 प्राथमिक शाळांचे वीज बिल घरगुती दराने आकारणार – विनोद तावडे
2 रत्नागिरीकरांचे आरोग्य धोक्यात
3 विद्यार्थिनींना अश्लील छायाचित्र दाखविणाऱ्या शिक्षकाला अटक
Just Now!
X