राज्यावर अस्मानी संकट कोसळले असून याला कोणतीही व्यक्ती जबाबदार नाही तरीसुद्धा हिंमत सोडू नका आणि आपल्या जीवनाबद्दल कोणतेही अनुचित निर्णय घेऊ नका असा दिलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गारपीटग्रस्तांच्या दौऱयात शेतकऱयांना दिला.
त्याचबरोबर राज्यसरकारने तातडीने गारपीटग्रस्तांना मदत जाहीर करावी यामध्ये आचारसंहिता आड येता कामा नये असे आवाहन देखील यावेळी राज ठाकरेंनी केले. ते लातूरमध्ये गारपीटग्रस्त दौऱयावर असताना बोलत होते. गारपीटग्रस्तांना योग्य मदत पोहोचविण्याचीही मागणी राज यांनी केली आहे.
गारपीटीबाबत मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर विरोधी पक्ष नेते पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडतील. उत्तराखंडमध्ये झालेल्या महाप्रलयासारखीच नैसर्गिक आपत्ती आज महाराष्ट्रात गारपीटीच्या माध्यमातून आली आहे. जवळपास ५० लाख हेक्टर परिसरात गारपीटीचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करणे शक्य नाही त्यामुळे पंचनामे करण्यापेक्षा तातडीने योग्य ती मदत राज्यसरकारने जाहीर करावी आचारसंहितेचा अडथळा निर्माण होता कामा नये असेही राज पुढे म्हणाले.