अॅमेझॉननंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. याचे महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागले असून त्यांनी या संदर्भात अभ्यास सुरु केला आहे. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे दुर्लक्ष केले. कोकणातील जमिनीची वाट लावणारे प्रकल्प लादले जात आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध दर्शवला.

शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांनी मनसेच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले, कोकणाने देशाला रत्ने दिली आहेत. पण दुर्दैवाने कोकणच्या पवित्र भूमीकडे दुर्लक्षच होत आहे. राजकारण्यांनीही कोकणाकडे दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकही फक्त गणेशोत्सवापुरताच कोकणात जातो. अॅमेझॉननंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. याचे महत्त्व लक्षात आल्याने अनेक सामाजिक संस्था यावर अभ्यास करत आहेत. या संस्थांना आपण विचारतही नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कोकण आणि केरळमध्ये साम्य आहे. मग केरळमध्ये जसा पर्यटनाचा विकास झाला तसा विकास कोकणात का नाही झाला?, असा सवाल त्यांनी विचारला. कोकणचा विकास करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय बळ हवे. आज कोकणातील जनता मनसेकडे पर्याय म्हणून बघत आहे हे लक्षात ठेवा, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कोकणमधील जमीन परप्रांतीय बळकावत आहे. कोकणच्या जमिनीची वाट लावणारे प्रकल्प आणले जात आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणातील खड्ड्यांच्या प्रश्नावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली.