व्हॅक्सिनची संख्या वाढावी यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना व्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली असे ट्विट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने मागणी परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. “सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी” असे या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! हाफकीनला लस निर्मितीसाठी परवानगी

दरम्यान, राज ठाकरे यांनीही हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होतीच जिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे म्हटले आहे.