नीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली त्यांना ‘नीट’ परीक्षेत प्राधान्य मिळायला पाहिजे. अशा स्वरूपाचा कायदा इतर राज्यांनी केला आहे, मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? आज महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार ह्या कडे दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे का नाही ?, असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ‘नीट’ परीक्षेवरुन राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना डावलले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘नीट’च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ह्या समस्येला सामोरे जावे लागते.  दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली आहे त्यांना ‘नीट’मध्ये प्राधान्य मिळायला हवे, असे त्यांनी सांगितले. अन्य राज्यांनी अशा स्वरुपाचा कायदा केला आहे. मग महाराष्ट्रात असा कायदा का नाही? आज महाराष्ट्रातील मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिक्षणात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्राधान्य मिळायला हवे. पण जर ‘नीट’ मध्ये परराज्यातील मुलांना प्रवेश द्यायचा प्रयत्न केलात तर ह्या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं लक्ष असेल, ह्याला धमकी समजायची असेल तर समजा, असे त्यांनी म्हटले आहे.

बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी हे काही आमचे शत्रू नाहीत. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रवेश मिळायला हवा, त्यानंतर जर काही जागा उरल्या तर मग इतर राज्यातल्या विचार करा, हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे ‘नीट’च्या विद्यार्थ्यांचे तेच दूध आंदोलनाचे, अमूलचे दूध महाराष्ट्रात आणण्यासाठी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले गेले, या आंदोलनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, असे त्यांनी सांगितले.