राम मंदिर हे झालेच पाहिजे, पण निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा विषय रेटू नये, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. गेल्या चार वर्षांत देशाचा विकास न झाल्याने भाजपाकडून आता राम मंदिर आणि भगवद् गीतेचा मुद्दा पुढे केला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिर, दूध आंदोलन आणि खड्ड्यांच्या मुद्द्यांवर मत मांडले. राम मंदिर हे झालेच पाहिजे, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तो विषय रेटू नये, असे त्यांनी सांगितले. भाजपाला धार्मिक तेढ पसरवायची असून यासाठीच हा उद्योग सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उंचीवरुन विधानसभेत गोंधळ सुरु आहे. मी स्वतः जेजे स्कुल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. असा पुतळा समुद्रात उभारणं किती अवघड आहे हे मला माहित आहे. ही भूमिका मी आघाडी सरकारच्या काळात देखील मांडली होती. महाराजांची खरी स्मारकं ही त्यांनी उभारलेले गड किल्ले आहेत, पुतळे उभारण्यापेक्षा ह्या गड किल्ल्यांची नीट निगा राखायला हवी, असे त्यांनी नमूद केले.

रस्त्यातील खड्डयांविरोधात आंदोलन केलं म्हणून महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी मारहाण केली. भाजपाने लक्षात ठेवावे की आज तुम्ही सत्तेत असाल, उद्या तुम्ही सत्तेत नसाल, तेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांशी असं वागलं गेलं तर चालेल का?, रस्त्यावर खड्डे जे पडले, त्याला सरकार जबाबदार आणि आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला मारहाण करणार?, असा सवालही त्यांनी विचारला.

आपल्या देशात काय सुरु आहे?. अगोदर नोटाबंदी मग दगडावर आडवं तिडवं व्हायचं. यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे का?, अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली. अगोदर देश फिट करा, मग फिटनेस चॅलेंजचे बघा. बुलेट ट्रेन करणे म्हणजे तुमच्यापासून मुंबई तोडण्याचे षडयंत्र असून या सर्व राज्यात घडत असलेल्या घडामोडी लक्षात घेता गुजरातच महाराष्ट्र चालवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.