ठाण्यात १८ नोव्हेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असून, या सभेसाठी मनसेने मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. या सभेची जाहिरात करताना सत्ताधारी भाजपलाही मनसेने चिमटा काढला आहे. १८ नोव्हेंबरला राज्य सरकार अघोषित लोडशेडिंग करणार असून जनरेटर्स, इन्व्हर्टर्स, मेणबत्त्या तयार ठेवाव्यात अशी पोस्ट राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर अपलोड करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आज (शुक्रवारी) राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून, शनिवारी ते ठाण्यात सभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. मनसे आणि राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

‘येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी राज्यशासन पुरस्कृत अघोषित लोडशेडिंग असणार आहे. सोशल मीडियाचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी अनेक भागातीस इंटरनेट सेवा विस्कळीत होऊ शकते. जिथे लोडशेडिंग लादता येणार नाही तिथे काळजीपूर्वक केबल कनेक्शन बंद केले जातील. शनिवारी संध्याकाळी काही तासांकरता आणीबाणीचा प्रयोग रचला जाणार आहे. याचे कारण एकच असून राज ठाकरे १८ नोव्हेंबरला ठाण्यात सभा घेणार आहेत’, असा चिमटा या पोस्टद्वारे काढण्यात आला आहे. अडाणी सरकारला याची कल्पना नाही की भाषण हे नंतर यूट्यूब, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर बघता येते, अशी टीकाही पोस्टमध्ये करण्यात आली आहे.

एल्फिन्स्टनमधील दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेटमधील रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात राज ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी राज्यातील काही भागांमध्ये लोडशेडिंग झाले. राज ठाकरे यांच्या मोर्चाला घाबरुन सरकारने लोडशेडिंग केली, असा आरोप मनसेच्यावतीने करण्यात आला होता.