आमची आरती त्रास देत नाही तर तुमचा नमाज का त्रास देतो आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर मशिदींवरचे भोंगे हटवले गेले पाहिजेत ही आपली भूमिका त्यांनी आज पुन्हा एकदा मांडली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना हाकला हा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे. जे मुसलमान देशाचा अभिमान बाळगतात त्यांना आम्ही कोणीही नाकारलेलं नाही. नाकारणार नाही.  अब्दुल कलाम, झहीर खान यांना आम्ही कधीही नाकारलेलं नाही. कुणीही यायचं आणि इथे यायचं आपला देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. बांगलादेशातून भारतात यायचं असेल तर फक्त अडीच हजार रुपये लागतात. पाकिस्तानातून येणारेही नेपाळमार्गे येत आहेत. माझं केंद्राला सांगणं आहे पहिल्यांदा समझौता एक्सप्रेस बंद करा.

बांगलादेश आणि पाकिस्तानातून येणारे घुसखोर हा मोठा धोका आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. असेच उभे राहिलेले अनेक मोहल्ले हे देशाला त्रास देणार. उद्या जर युद्ध झालं तर आपल्याला आतच लढावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयावर टीका केली मात्र जी गोष्ट योग्य वाटली तेव्हा मी अभिनंदनही केलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राम मंदिर, अनुच्छेद ३७० या निर्णयांवर मी मोदी सरकारचं अभिनंदनही केलं आहे कारण मी माणूसघाणा नाही. बाहेरुन आलेल्यांना का पोसायचं? हे लोक कोण आहेत? कुठे आहेत याची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर माझा प्रचंड विश्वास आहे. एकदा ४८ तासांसाठी मोठा हात द्या त्यांना बघा ते काय करु शकतात असंही आवाहन राज ठाकरेंनी म्हटलं आहे. CAA, NRC वरुन अनेक मुसलमान रस्त्यावर आले. या मुसलमानांच्या मनात राम मंदिर आणि अनुच्छेद ३७० बाबतचा राग आहे. त्या मोर्चांमधून राग व्यक्त केला गेला. आता मी हे विचारतो आहे की त्यात इथले मुसलमान किती आहेत? बाहेरच्या मुसलमानांना इथले मुसलमान साथ देत असतील तर आम्ही का साथ द्यायची तुमची असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.