29 September 2020

News Flash

राज ठाकरे राष्ट्रवादीचे ‘स्टार प्रचारक’ ?

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी ते निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांचा नक्की सहभाग कशा प्रकारे असेल, ते राष्ट्रवादीच्या मंचावरुन प्रचार करणार की मनसेच्या मंचावरुनच करणार, याबाबत संदिग्धता आहे. ज्या मतदार संघात राष्ट्रवादीसमोर भाजपा- शिवसेनेचे कडवे आव्हान असेल त्या मतदार संघात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तसेच राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे सूचक विधान त्यांनी केले होते. राज ठाकरे यांनी भाषणांमधून मोदी- शाह यांच्यावर बोचरी टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनसेला महाआघाडीत स्थान देण्यास तयार होते. मात्र, काँग्रेसने मनसेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने मनसेशी छुपी आघाडी करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. इंडियन एक्स्प्रेसला राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर भाजपा – शिवसेनेचे कडवे आव्हान असेल, त्या मतदारसंघात राज ठाकरे हे सभा घेतील. आता राष्ट्रवादीची ही रणनिती यशस्वी होते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मनसे आणि निवडणूक
२००९ मधील लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या भागांमध्ये मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १२ आमदार निवडून आले होते. पण २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेची पिछेहाट झाली. या निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला फक्त एकाच जागेवर विजय मिळाला होता. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मनसेला १. ४७ टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला २७. ५६ टक्के, शिवसेनेला २०. ८२ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला १८. २९ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६.१२ टक्के मते मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 2:22 pm

Web Title: mns chief raj thackeray star campaigner for ncp against bjp campaign in maharashtra
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मंत्रालयातील सचिवाची राहत्या घरी आत्महत्या
3 काँग्रेस उमेदवार बांदिवडेकर वादात ; ‘सनातन’शी संबंध असल्याची चर्चा
Just Now!
X