News Flash

हात जोडून विनंती! अशी वेळ येऊ देऊ नका; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

संघर्षाला घाबरु नका असंही केलं आवाहन

मनसेच्या नांदेड येथील पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. तसंच राजसाहेब मला माफ करा, आमच्या येथे पैसा आणि जात दोन्ही गोष्टींवर राजकारण होतं आहे, दोन्ही माझ्याजवळ नाही. असा उल्लेख केला होता. या घटनेनंतर राज ठाकरे हे भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं. राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पत्र पोस्ट केलं आहे. या पत्रात त्यांनी कार्यकर्त्यांना धीर सोडू नका असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र.

संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.

सुनील ईरावर ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की ‘साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा. ‘

अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.

मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा… त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत… ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे… असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.

आपला नम्र,
राज ठाकरे.

 

रविवारी नांदेडच्या किनवटमध्ये मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने आत्महत्या केली. ही बातमी आज प्रसारमाध्यमांमध्ये आली. त्यानंतर अस्वस्थ झालेल्या राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 9:17 pm

Web Title: mns chief raj thackeray wrote a emotional letter to mns party workers after nanded mns party worker suicide scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात ८ हजार ४९३ नवे करोना रुग्ण, संख्या ६ लाखांच्याही पुढे
2 तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, पाच जखमी
3 कोल्हापूर : पंचगंगा नदी इशारा पातळीवर; अलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्न
Just Now!
X