२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमधली सत्ता भाजपने गमावली. यासोबत तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्येही भाजपाने अपेक्षेप्रमाणे निराशाजनक कामगिरी केली आहे. या पराभवानंतर सर्वच स्तरातून नरेंद्र मोदींवर टिकेचं सत्र सुरु झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी आणि भाजपवर बोचरी टिका केली आहे.

आपल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी मोदींना सत्तेच्या खुर्तीत बसलेलं दाखवून पराभवानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकल्याचं दाखवलं आहे. नेहमीप्रमाणेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर याला नेटीझन्सनी आपल्या पसंतीची पावती दर्शवली आहे.

पाच राज्यांच्या निकालावर आपली प्रतिक्रीया देताना राज ठाकरे यांनी थापेबाजी फार काळ चालत नाही असं म्हटलं आहे. रेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मुजोर भाषेला हे उत्तर असल्याचंही ते बोलले आहेत. मी पाच राज्यातील जनतेचं अभिनंदन करतो, त्यांनी यानिमित्त चांगला पायंडा पाडला असं सांगताना पप्पू आता परमपूज्य झाला आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.