“बाई जरा दमानं घ्या,” असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यामधील नगरसेविका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अमृता यांनी ‘ठाकरे’ अडनावावरुन टीका केली होती. त्याच वादामध्ये मनसेच्या नगरसेविकेने उडी घेतली आहे.

काय म्हणाल्या रुपली ठोंबरे?

रुपाली यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अमृता या डोक्यावर पडल्याचा खोचक टोला रुपाली यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. “वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत, बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेंचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे? मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानवर या,” असं रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच “काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सद्बुद्धि मागा लवकर देईल बाप्पा सद्बुद्धि,” असंही रुपाली या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याबद्दल काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

दुसऱ्या एका पोस्टमधून रुपाली यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “अमृता फडणवीस या स्वतंत्र व्यक्तीमत्व असून त्यांना त्यांची मते आहेत,” असं उत्तर फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं. यावरुनच रुपाली यांनी अमृता यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला आहे. “बाई तुम्ही राजकारणात या, चांगले काम करा. स्वतंत्र्य व्यक्तिमत्त्वच्या म्हणजे तुम्ही काहीही बोलणे असे नसते,” असं रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “तुम्ही भानावर या कारण महिला म्हणून माजी मिसेस मुख्यमंत्री म्हणून तुमची काळजी आहे,” असा टोलाही रुपाली यांनी लगावला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी, “केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात”, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती. फडणवीसांच्या याच ट्विटचा धागा पकडून अमृता यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.. देवेंद्र फडणवीसांच्या राहुल गांधींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी, “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी… त्याचप्रमाणे केवळ ठाकरे आडनाव लावल्यानेही कोणी ठाकरे होत नाही… त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं… एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्विट केलं होतं.
विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टॅग देखील केलं होतं.

शिवसेनेकडून निषेध

शिवसेनेने या टीकेचा निषेध केला असून काही शिवसैनिकांनी अमृता फडणवीस यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलनही केले. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई आणि शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ट्विटवरुन अमृता यांच्यावर निशाणा साधला होता.

शिवसेनेवर पलटवार करताना काय म्हणाल्या अमृता?

शिवसेनेच्या आंदोलनानंतर अमृता यांनी पुन्हा ट्विटवरुन शिवसेनेवर टीका केली होती. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करताना पिंपरीत शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. ज्या पोस्टरवर हे जोडे मारण्यात आले त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो होता. या आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत अमृता यांनी “तुम्ही लोकांना मारहाण करत नेतृत्व करु शकत नाही. हा हल्ला आहे, नेतृत्त्व नाही,” असा टोला लगावला होता.

या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत नोंदवलं असलं तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही.