मोदी सरकारची महिलांबाबतची भूमिका दुटप्पी आहे. ही बाब निषेधार्ह आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे सेनादलांमध्ये महिला अधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याची मानसिकता पुरुष अधिकाऱ्यांमधे नसते असे म्हणायचे ही बाब निषेधार्ह आहे असं मनसेनं म्हटलं आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भातली एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला असून मोदी सरकारची महिलांबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला आहे.
शालिनी ठाकरे यांनी काय म्हटलं आहे या पोस्टमध्ये?
“सेनादलांमध्ये ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या पुरुष अधिकाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, महिला अधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याची मानसिकता त्यांमध्ये नसते. महिलांचे आदेश पाळण्यात पुरुषांना कमीपणाचे वाटते” अशा शब्दात केंद्र सरकारने देशातील निम्म्या लोकसंख्येचा म्हणजे महिलांचा पुन्हा एकदा अपमान केला आहे. एकीकडे, महिलांच्या सक्षमीकरणाचा बाता मारायच्या आणि दुसरीकडे, महिलांबाबत दुटप्पी भूमिका घ्यायची, हीच केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका आपल्याला वारंवार पाहायला मिळते. सरकारच्या या दुटप्पीपणाचा करावा तितका निषेध थोडाच.
भारतीय सैन्यात महिलांना समान वागणूक, समान सन्मान मिळावा ह्यासाठी आणखी काही काळ महिलांना लढावं लागणार आहे, हेच यातून सिद्ध झालंय. सुदैवाने, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांच्या सैन्यात मात्र महिलांना पुरुषांइतकाच सन्मान दिला जातो. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रत्येक जण समान आहे- मग ती स्त्री असो की पुरुष! म्हणूनच पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेने आयोजित केलेल्या उद्याच्या महामोर्च्यात महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरायला हवं. स्त्री-शक्तीच्या विराट रुपाचं दर्शन अवघ्या देशाला घडवायला हवं!
आता या पोस्टला भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ९ फ्रेब्रवरीला होणाऱ्या मनसेच्या मोर्चात महिलांनाही सहभागी व्हावं असंही आवाहन शालिनी ठाकरे यांनी केलं आहे. आता उद्या होणाऱ्या मोर्चात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 4:13 pm