भाजपने साथ सोडल्यामुळे डबघाईला आलेल्या मनसेच्या इंजिनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांनी साथ दिल्याने नाशिक महापालिकेत नवीन राजकीय समीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मनसेने या पक्षांशी आघाडी केल्याने त्यांना सत्ता अबाधित राखण्यासाठी मदत झाली आणि महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक तर उपमहापौरपदी अपक्ष गटाचे गुरुमित बग्गा विराजमान झाले.
महायुतीच्या फोडाफोडीच्या राजकारणास लगाम घालण्यासाठी सर्व एकत्रित आल्याचा दावा नवनिर्मित महाआघाडीने केला आहे, तर काँग्रेस व मनसे यांची छुपी युती यानिमित्त उघड झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात विलक्षण रंग भरले गेले. भाजपने याआधीची साथ सोडून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर मनसेने पालिकेतील सत्ता राखण्यासाठी काँग्रेस आघाडी आणि अपक्षांशी हातमिळवणी केली. मनसे व काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक युतीला जाऊन मिळाल्यानंतरही महाआघाडीला विजयश्री प्राप्त करणे फारसे अवघड गेले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने आपली मते मनसेच्या पारडय़ात टाकताना सत्तेत थेट सहभागी होण्याचे टाळले. महाआघाडीचे अशोक मुर्तडक (७५ मते) यांनी युतीचे सुधाकर बडगुजर (४४) यांना पराभूत केले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या गुरुमित बग्गा यांनी (७५ मते) युतीचे संभाजी मोरुस्कर यांचा (४३) पराभव केला. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तटस्थ राहून मनसेला अप्रत्यक्षपणे मदत केली होती. यंदा मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारास थेट मतदान केले. युतीला रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीने मनसेला मदत केल्याचा दावा मनसेचे आमदार वसंत गिते यांनी केला. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी मनसे आणि काँग्रेस आघाडी यांची छुपी युती आता उघड झाल्याचे म्हटले .