पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्याबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोदी सरकारला सवाल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. करोनामुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीविषयी पंतप्रधान मोदी यांनी देशाला माहिती दिली. त्याचबरोबर या संकटातून बाहेर पडून झेप घेऊ, असा आशावादही व्यक्त केला. मोदी म्हणाले,”करोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी रोजगारनिर्मिती करणाऱ्या विविध उद्योगांसाठी केंद्राने आर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यासंदर्भात गेल्या आठवड्यात निरनिराळ्या क्षेत्रांतील प्रतिनिधींशी चर्चाही केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं टीका केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. “२० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे PMCare फंडासाठी एव्हढी जाहिरात का करत आहेत?,” असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

नवे नियम, नवी टाळेबंदी

मोदी यांनी लॉकडाउन वाढवणार असल्याचीही घोषणा केली. “जगभरातील संशोधक, तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, करोनाचा विषाणू बराच काळ आपल्या सर्वाच्या आयुष्याचा भाग बनून राहील. त्यापासून आपली सुटका होणार नसली तरी ही महासाथ म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य नव्हे. संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करून लोकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे सांगत मोदींनी टाळेबंदी शिथिल करण्यात येणार असल्याचे संकेत दिले. मात्र, १८ मेनंतरही टाळेबंदी कायम राहणार असल्याचेही अधोरेखित केले. टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात मध्ये नवे नियम लागू केले जातील. राज्यांनी केलेल्या सूचनांच्या आधारे पुढच्या टाळेबंदीची अंमलबजावणी केली जाईल. नव्या टाळेबंदीची सविस्तर माहिती १८ मेआधी देण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.