महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ व्या वर्धापनाचा कार्यक्रम पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर सामनाच्या संपादकीयमधून टीकेचा बाण सोडला होता. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी ‘शॅडो’ की काय ते बनवले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर टीका केली होती. त्यावर मनसेनं आता प्रत्युत्तर दिलं आहे. शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार असं म्हणत मनसेनं त्यांना जळजळीत प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी सामनाच्या संपादकीयवरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. “शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा- १०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ बनवले नाही, पण… शिवसेनेची मनसेवर टीका

काय म्हटलंय अग्रलेखात?
महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले.

पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.

संसदीय लोकशाहीचा तो अविभाज्य भाग आहे. किंबहुना त्याचे वर्णन ‘पर्यायी पंतप्रधान’ (प्रिटेंडर टू डू प्राइम मिनिस्टर्स थ्रोन) असेच केले जाते. लोकशाही व विरोधी पक्षाच्या बाबतीत हे घडाभर तेल ओतायचे कारण असे की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर ‘नजर’ ठेवण्यासाठी एक ‘शॅडो कॅबिनेट’ एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे ‘शॅडो’ मंत्रिमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे ‘शॅडो कॅबिनेट’ बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर केले आहे. सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले असल्यास त्यांचे अभिनंदन करावे असेही सांगण्यात आले.