एरवी कुणालाही कॉल केल्यानंतर रिंग कानावर पडायची, पण करोनानंतर एक वेगळाचं आवाज कानावर पडायला लागला. तो होता करोनासंदर्भात जनजागृती करणारा संदेश. देशात करोनानं प्रवेश केल्यानंतर ही सूचना कॉल केल्यानंतर प्रत्येकवेळी ऐकायला मिळते. पण, त्यामुळे अनेकदा जास्त वेळ जातो. करोनासंदर्भातील कॉलर ट्यूनबद्दलचा हाच मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. ही कॉलर ट्यून आता बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकार, आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी जाहिराती, मेट्रो, लोकलमध्येही करोनापासून सुरक्षित राहण्यासंदर्भातील माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्याचबरोबर दूरसंचार विभागानंही कॉलर ट्यूनवरून करोनाबद्दल जनजागृती सुरू केली होती. मागील पाच महिन्यांपासून ही कॉलर ट्यून लोकांच्या कानावर पडत असून, आता ती सरावाची झाली आहे. मात्र, या कॉलर ट्यूनमुळे उद्भवणाऱ्या समस्येकडे बाळा नांदगावकर यांनी लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा- राज्यात २४ तासांत ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक ट्विट केलं आहे. “करोनासंदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून करोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी,” अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

आणखी वाचा- करोनाबाधितांची संख्या २९ लाखांच्या पुढे; चोवीस तासात आढळले ६८,८९८ नवे रुग्ण

देशातील करोनाची स्थिती

शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९८३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५४,८४९ झाली आहे. देशात ६८,८९८ नवी प्रकरणं समोर आली. देशातील बाधितांची संख्या वाढून २९,०५,८२४ झाली आहे. यांपैकी ६,९२,०२८ लोकांवर उपचार सुरु आहेत. तसेच २१,५८,९४७ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.