24 October 2020

News Flash

“…नाहीतर लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल”; मनसेने मुख्यमंत्र्यांना घातली साद

"आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण..."

प्रातिनिधिक फोटो

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे आणि शेताच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्याची विचारपूस करावी अशी साद घातली आहे.

मनसेचे प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं असून शेतीचं नुकसान ऑनलाइन बघता येणार नाही असंही म्हटलं आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत ध्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल,” असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

याच ट्विटबरोबर बाळा नांदगावकर यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने हातचं पिक गेल्यामुळे हवालदील होऊन रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मनसेबरोबरच काही वृत्तवाहिन्यांनाही टॅग केलं आहे.

सोलापूर, सांगलीत मुळसधार

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली जिल्ह्य़ाला बुधवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसाने मोठा तडाखा दिला. या दोन जिल्ह्य़ांच्या बहुतांश भागात शंभर मिलिमीटरच्या सरासरीने अतिवृष्टी झाली. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांतही नुकसान केले आहे. या पावसाने या भागातील नद्यांना पूर आले, शेत-शिवारात पाणी शिरले. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात ५६५ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पाऊस कोसळत असतानाच बुधवारी रात्रीपासून उजनीतून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने भीमा नदीकाठच्या अकलूज, पंढरपूर, सांगोला आदी तालुक्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्य़ातील १७ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचावकार्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले.

सांगली जिल्ह्य़ातील कृष्णेसह येरळा, अग्रणी, नांदणी, माणगंगा आदी नद्यांना पूर आला तर अनेक मार्गावर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. कृष्णा नदीची पाणीपातळी केवळ २४ तासांत २५ फुटांनी अचानक वाढल्याने नदीकाठच्या रहिवाशांना हलवण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली. खरिपाची काढलेली पिके, भाजीपाला शेतातच सडून गेला. नदीकाठच्या शेतातील पिकांसह मातीही वाहून गेली आहे.

पुण्यातही मोठा फटका

पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला. तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. पळसदेव, भादलवाडी, मदनवाडी येथील तलावांना भगदाड पडून पिके, ताली, बांध-बंदिस्त केलेली शेती यांचे मोठे नुकसान झाले. बारामती तालुक्यातही दीडशे मिमी पावसाची नोंद झाली असून, शेतीचे मोठे नुकसान झाले.

साताऱ्यातही मोठं नुकसान

सातारा जिल्ह्य़ात बुधवारी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने शेतीचेही मोठे नुकसान झाले. पावसाचा जोर वाढल्यावर कोयनेसह अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ३३,९२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातही दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेची पातळी २४ तासांत १० फुटांनी वाढली आहे.

रत्नागिरीमध्ये भातशेतीचे नुकसान

रत्नागिरीत कापणीला आलेल्या सुमारे ३० टक्के भातशेतीचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर, तर नाचणीचे ९ हजार हेक्टर आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी हाताशी आलेले पीक आडवे झाले. राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली आणि रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला. अर्जुना नदीच्या पुरामुळे गोठणे दोनिवडेसह इतर गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत घुसले. जवाहर चौकातील काही टपऱ्या पाण्याखाली गेल्या.

रायगडमध्ये कापणीला आलेले पीक आडवे

रायगडमध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला. वादळी पावसामुळे कापणीला आलेले पीक आडवे झाले. काही ठिकाणी कापून शेतात ठेवलेले पीक भिजले. रायगड जिल्ह्यात यंदा ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे.

शनिवारी जोर ओसरण्याचा अंदाज

राज्याच्या बहुतांश भागात हाहाकार उडवून दिलेल्या पावसाचा जोर शनिवारी (१७ ऑक्टोबर) ओसरणार असून, शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे अरबी समुद्रात राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:45 pm

Web Title: mns leader bala nandgaonkar says cm uddhav thackeray should help farmers or they will lost faith over thackerays scsg 91
Next Stories
1 पुणे महापालिकेने ‘त्या’ कामावर लक्ष द्यायला पाहिजे होते : अजित पवार
2 एकाच कुटुंबातील चार मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, जळगावातील धक्कादायक घटना
3 तेजस ठाकरेंना सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमध्ये हिरण्यकश नदीत सापडला नवा मासा; नाव ठेवलं…
Just Now!
X