News Flash

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा टोला

आपल्याकडे प्रश्नांची नाही तर निर्णय घेण्याची कमतरता, राज ठाकरेंचा हल्लाबोल

“आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. आज त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसंच सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही असं म्हणत टोला लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढील वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे राजभवनात पोहोचले होते. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते. वीज बिल कमी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी भेटीनंतर व्यक्त केली. “विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश अडकले आहेत, रेल्वे सुरू होत नाहीये, महिलांचे प्रश्न आहेत, कशासाठी सरकार कुंथतंय हे समजत नाही. कुंथत कुंथत सरकार चालत नाही. रस्त्यात वाहतुककोंडी आहे. रेस्तराँ सुरू झालीयेत पण मंदिरं उघडली नाहीयेत, धरसोडपणा काय सुरू आहे हे समजत नाही. सरकारनं नीट विचार करून लोकांना एकदाच काय ते स्पष्ट करावं,” असंही ते म्हणाले.

“आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना एक निवेदन दिलं. लोकांना येत असलेल्या वीज बिलांसंदर्भात निवेदन दिलं. गेले काही दिवस मनसैनिक सर्व ठिकाणी आंदोलन करत आहेत. अनेकांनी माझी भेट घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला वीज बिलं कमी करू असं सांगितलं. परंतु एमईआरसीनं मान्यता दिली पाहिजे असं ते म्हणाले. त्यानंतर आमच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली. आमच्याकडे त्यांचं लेखी पत्रही आहे,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. कंपन्या वीज बिलं कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, आमचं त्यावर दडपण नाही, असं एमईआरसीनं सांगितलं. राऊतांशीही यावर बोलणं झालं. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिल्याचाही ते म्हणाले. राज्य सरकारला हे माहित आहे तर सरकार कशावर अडलंय हे माहित नाही. सरकारनं यावर निर्णय घेतला पाहिजे. शरद पवारांशी यावर फोनवर अथवा प्रत्यक्षात भेट घेईन गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

गेले अनेक महिने अनेकांचे रोजगार गेले आहेत. असे विषय असताना अव्वाच्या सव्वा बिलं येत आहेत. लोकं कुठून बिलं भरणार. लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारनं लवकरच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. सरकार आणि राज्यपालांचं फारचं सख्य असल्यामुळे हा विषय किती पुढे जाईल याची कल्पना नाही. राज्याचे प्रमुख म्हणून ते सरकारसमोर विषय मांडतील अशी अपेक्षा आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 11:46 am

Web Title: mns leader raj thackeray criticize uddhav thackeray government over various issues bhagat singh koshyari jud 87
Next Stories
1 राज्यपालांनी राज ठाकरेंना दिला शरद पवारांना भेटण्याचा सल्ला, म्हणाले…
2 राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट, मांडला वाढीव वीज बिलाचा मुद्दा
3 “इच्छाशक्तीच्या जोरावर वाहतूक कोंडी फोडून दाखवू”; मनसे आमदार राजू पाटील उतरले रस्त्यावर
Just Now!
X