करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून राज्यातील नागरी भागात कलम १४४ लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणाच त्यांनी केली होती. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनीदेखील या लॉकडाऊनबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

आपण सगळ्यांनी जर सरकारनं सांगितलेल्या गोष्टी सहज स्वीकारल्या तर इतरांचं आयुष्य कायमचं ‘लॉकडाऊन’ होण्यापासून थांबवता येईल, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. आत्ताच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी, सध्या यापेक्षा दुसरा कुठला उपाय पण नाही. त्यामुळे याकडे सकारात्मकरित्या पाहिलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

अमित ठाकरे यांनी फेसबुकवरून आपलं मत व्यक्त केलं आहे. कधी कधी असा लादलेला ‘लॉकडाऊन’ पण चांगला असू शकतो. तुम्हाला घरच्यांशी बोलायची संधी मिळाली आहे, असंही ते म्हणाले. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं. “मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाहीत. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणाऱ्यांनी एकटं रहावं,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. “गरज नसताना घराबाहेर पडू नका तसंच जी जी लोकं गेल्या १५ दिवसांमध्ये विदेशातून आली आहेत त्यांना समाजात फिरू नका, त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल तर तुम्हीही समाजात फिरू नका,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.