मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतल्याचेही समोर आले आहे. यावरून महाराष्ट्र नविनिर्माम सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ‘या’ प्रमुख १२ मुद्यांवर झाली चर्चा!

“आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .” असं संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?”

या अगोदरही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर विविध मुद्यांवरून टीका केलेली आहे. राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढण्यात आला. राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या ५ टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तेथील नियम देखील बदलणार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला होता.

“मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे विचारला होता.

पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीवर उदयनराजेंनी केलं मोठं विधान, म्हणाले….

तर, आज झालेल्या पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल, खासदार उदयनराजे यांनी देखील खळबळजनक विधान केलं आहे.   “ पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवायला हवं होतं. त्यामध्ये चर्चा करायला हवी होती. चर्चा घडवून आणायला पाहिजे होती. मग त्यांना तुम्ही कधीही भेटा. आता हे भेटून त्यांना काय सांगणार? म्हणजे राजकीय तडजोड, ठीक आहे आम्ही हे करतो पण असं असं.. आपण एकत्र येऊया म्हणजे परत सत्तांतर होणार, म्हणजे काय? देवाण-घेवाणच होणार ना? काहीतरी असंच होणार असं मला वाटतंय, हो की नाही?” असं उदयनराजे म्हणाले आहेत.