“लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे. परंतु लोकांचा कंटाळा घावण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हेदेखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाउन उठवला आणि अचनाक साथ वाढली, त्यात लोकांचे जीव गेले तर पोटापाण्याच्या प्रश्नाचं काय करणार?,” असं सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून आता मनसेनं उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “कोणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉकडाउन काढता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. याच्याशी १०० मी सहमत आहे. परंतु कोणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून लॉकडाउन वाढवताही येणार नाही असं महाराष्ट्राची जनता म्हणत आहे,” असं संदीप देशपांडे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

“लोकं कंटाळली आहेत हे मान्य आहे. परंतु लोकांचा कंटाळा घावण्यासाठी आपण अनलॉक करत नाही. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्नही निर्माण होतोय हेदेखील मान्य आहे. पण जर आपण एकदम लॉकडाउन उठवला आणि अचनाक साथ वाढली, त्यात लोकांचे जीव गेले तर पोटापाण्याच्या प्रश्नाचं काय करणार?,” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. “जर कारखान्यांमध्येदेखील ही साथ गेली तर काय करणार? जर असं हवं असेल तर किती साथ पसरायची ती पसरेल, जेवढ्या लोकांचे जीव जायचे ते जातील पण आम्हाला लॉकडाउन नको, मग ही बाब स्वीकारावी लागेल. अमेरिकेत जसं केलं तसं माझी स्वीकारण्याची तयारी नाही. मी म्हणजे काही ट्रम्प नाही. मी माझ्या लोकांना माझ्या डोळ्यासमोर तळमळताना मी पाहू शकणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.