आज महात्मा गांधींची १५१ वी जयंती आहे. त्यानिमित्त मनसेनं अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुकीपूर्वीचा उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची देशपांडे यांनी आठवण करून दिली आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे हे टोलमुक्तीच्या विषयावर बोलताना दिसत आहेत.

“रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम. सरकार को सन्मती दे भगवान. सत्याचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींना विनम्र अभिवादन,” असं संदीप देशपांडे यांनी यासोबत म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. निवडणुकीपूर्वीच्या या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे हे टोलमुक्तीवर बोलताना दिसत आहेत. दरम्यान, आपल्या वचननाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राचं वचन असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. तसंच राज्यात आणि केंद्रात आपलंच सरकार येणार असून ते आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र करणार असल्याचं आश्वासन देतानाही ते या व्हिडीओत दिसत आहेत.

यापूर्वी अनेकदा संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली होती. तसंच मुंबईतील जनतेची मागणी उचलून धरत रेल्वे सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंगही केला होता. यादरम्यान त्यांनी लोकलनं प्रवास केला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. तसंच काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी या मागणीसह मुंबईच्या डबेवाल्यांच्या एका शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेटही घेतली होती.