राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष मोदींविरोधात प्रचार करणार असल्याने आमचा फायदा होणार आहे. मोदी आणि अमित शाह यांना घालवणं हा त्यांचे धोरण त्यांनी त्यांच्या भाषणातून जाहीर केले. त्यांचे या धोरणामुळे आमचा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा फायदा होणार आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. देशात भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे त्यांच्या भाषणात मुद्दे मांडले आणि जी भूमिका जाहीर केली त्याचा फायदा राष्ट्रवादीला निश्चितपणे होईल. देशात भाजपाविरोधी वातावरण आहे. राज ठाकरे यांनी ते आता पुढचा प्रचार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवण्यासाठी करणार आहेत असं जाहीर केलं आहे. याचा आम्हाला फायदा होईलच असे भुजबळ यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी महाराष्ट्र सदन घोटाळ्याबद्दल आणि तुरुंगावासाबद्दलही त्यांना विचारणा करण्यात आली. ज्यावर भुजबळ म्हटले की माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य नाही असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानंतर घेतलेल्या सभेत  मनसेची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आमच्या फायद्याची आहे असं आता भुजबळ यांनी म्हटलं आहे.

२०१४ मध्ये राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला होता. आता मात्र चित्र पूर्ण बदललं आहे. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक करणारे राज ठाकरे आता त्यांच्या विरोधात बोलत आहेत. मनसेला आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादीने केला. मात्र राज ठाकरेंनी कोणासोबतही न जाता मोदी आणि शाह यांना हटवणं हेच आपलं उद्दीष्ट असल्याचं सांगितलं होतं.

एक काळ असा होता की नाशिक महापालिकेत सत्ता येण्याआधी राज ठाकरेंनी जे भाषण केलं होतं त्यात छगन भुजबळ यांची नक्कल करत त्यांच्यावर चांगलीच टीका केली होती. आता मात्र राज ठाकरेंचा सूर बदलला आहे. त्यामुळेच त्यांनी घेतलेली भूमिका कशी योग्य आहे हे आता छगन भुजबळच प्रसारमाध्यमांना सांगत आहेत.