19 September 2020

News Flash

आज मनसे अधिवेशनात काय होणार? जाणून घ्या ५ मुद्दे

राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आज (गुरुवार) गोरेगाव येथील नेस्को संकुलात होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सकाळी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवा झेंडा?
पक्षाचा सध्याच्या झेंड्यातील चार रंगाऐवजी नवा झेंडा एकाच रंगाचा असेल. भगव्या किंवा केशरी रंगाच्या या झेंड्यावर राजमुद्राही असेल असे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला केवळ एका जागी यश मिळाल्यामुळे मनसे आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक हिंदुत्ववादी पक्षाची उणीव भरुन काढण्याच्या दिशेने राज या विचार करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सर्वसामावेश’ विचारधारेतून तयार करण्यात आलेल्या मनसेच्या सध्याच्या झेंड्याऐवजी भगव्या झेंड्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.

शिवसैनिकांना ‘मनसे’ आवाहन?
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं होतं. “पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”, असं ते म्हणाले होते. आता अधिवेशनात राज ठाकरे याबाबत काय बोलतील हे पहावं लागणार आहे.

मनसे भाजपासोबत जाणार ?
लोकसभा निवडणुकीच्या वेळी १० सभा घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपाला या विरोधी प्रचाराचा काहीही फरक पडला नाही. कारण देशात ३०३ जागा मिळवत पुन्हा भाजपाचीच सत्ता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडून द्या अशी मागणीही त्यांनी केली होती. आता एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर मनसेने जरी भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले असले तरीही भाजपा मनसेला स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे भाजपासोबत जाऊ शकते असे संकेत दिले होते. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. हे तीन पक्ष एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. आता भाजपालाही प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका स्वीकारली तर मनसे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. पक्षाला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काळानुसार काही बदल करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं असंही ते म्हणाले होते. त्यामुळे आता राज ठाकरे आजच्या अधिवेशनात याबाबत काय निर्णय घेतील हे पहावं लागेल.

हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार?
मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची सध्याची नाजूक स्थिती पाहता पक्षामध्ये आता नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय तग धरणे अवघड आहे. याची प्रकर्षाने जाणीव झाल्याने मनसे नेत्यांची यावर उपायांची चाचपणी सुरु केली आहे. त्यानुसार, ‘राज’पुत्र अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी टाकण्यात यावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी राज यांच्याकडे केली होती. त्यामुळे आजच्या मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांचा राजकारणात अधिकृत प्रवेश होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 8:13 am

Web Title: mns mahaadhiveshan mumbai raj thackeray what will be his stand five points jud 87
Next Stories
1 मनसेच्या नव्या भूमिकेसाठी आशीर्वाद देणाऱ्या ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाची सर्वत्र चर्चा
2 मनसेचं ‘महा’अधिवेशन; राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
3 मंत्री धनंजय मुंडेंबद्दल नीट बोल अन्यथा जीवे मारू ‘
Just Now!
X