मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “२७ गावांची वेगळी महानगरपालिका करण्याबाबत पालकमंत्र्यांची नियत साफ दिसत नाही,” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शुक्रवारी राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना २७ गावांबाबत प्रश्न विचारण्यात आला. गुलाबी रस्त्यांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते. त्यानंतर २७ गावांबाबतच्या इथल्या ग्रामस्थांच्या भावना त्यांच्या ध्यानात आल्या होत्या. त्यावेळी लोकांच्या भावना असतील तर योग्य तो निर्णय घेण्याच्या सुचना त्यांनी पालकमंत्र्यांना दिल्या. यातून मुख्यमंत्र्यांची नियत साफ दिसते. परंतु पालकमंत्र्यांची नाही,” असं म्हणत पाटील यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.

“पुढील आठवड्यात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या कामाचीही स्तुती केली. लहान सहान गोष्टी या प्रशासकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असतात. आयुक्तांनी स्कायवॉक मोकळा करून नागरिकांचा त्रासही कमी केला आहे,” असंही ते म्हणाले.