महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव समोर दिसत असल्याने नैराश्यातून शिवसेनेवर आणि कुटुंबावर आरोप केले जात आहेत. मनसेला आता योगाची गरज असल्याचे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे नागपुरात आले असता बोलत होते. मुंबईला जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज भरण्याच्यावेळी झालेला राडा हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. राज्यात महायुतीची वाढती ताकद बघता आता मनसेला नैराश्य आहे, त्या नैराश्यातून जाहीर सभामध्ये आरोप केले जात आहेत. नैराश्य आले असेल तर त्यासाठी त्यांना योगाची गरज
आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज भरायला आले त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गाडीत सोडा वॉटरच्या बाटल्या, दगड कसे आले? काही तरी गोंधळ घालण्याचा मनसेचा हा पूर्वनियोजित डाव होता. या सर्व प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकत्यार्ंनी संयम ठेवला, त्यामुळे परिस्थिती लवकर सुरळीतझाली.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्याबाबत मात्र आदित्य ठाकरे यांनी बोलणे टाळले. मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांवर काही फरक पडणार नाही. मुंबईसह अन्य ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.