तालुक्यातील भावली धरणातून शहापूरला पाणी देण्याचा घाट घातला जात असून या धरणातून इगतपुरी व घोटी शहराला थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा तसेच परिसरातील वाडय़ापाडय़ांची तहान भागविल्याशिवाय धरणातील पाणी शहापूरला जाऊ देणार नाही, अशी भूमिका तालुका मनसेने घेतली आहे. यासाठी पक्षपातळीवर आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. रतनकुमार इचम यांनी दिला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी करण्याच्या उद्देशाने इगतपुरी तालुका मनसेची संघटनात्मक आढावा बैठक प्रदेश सचिव प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या वेळी तालुक्यातील समस्या मांडण्यात आल्या. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे आदी उपस्थित होते. तालुक्यातील वाढती बेरोजगारी, स्थानिक बेरोजगारांचा विषय आगामी काळात पक्षपातळीवर घेऊन आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे मत संदीप किर्वे यांनी मांडले. या दोन्ही प्रश्नांसंदर्भात पंधरवाडय़ात पाणीपुरवठामंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही प्रमोद पाटील यांनी दिली.