ठाण्यात लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. ‘गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. किती दिवस या लोकांना सहन करायचे ?. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू, असा इशाराच मनसेने दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमधूनच मुंबईत घाण येते, अशा शब्दात मनसेने उत्तर भारतीयांवर टीका केली.

ठाण्यात अडीच वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. स्थानिकांनी नराधमाला चोप दिला, मात्र तिथून हा नराधम पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. व्हिडिओच्या आधारे नराधमाचा शोध घेतला जात होता. सोमवारी ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी या व्हिडिओतील नराधमाला पत्रकार परिषदेत आणले. हा नराधम मूळचा बिहारचा आहे. त्याने यापूर्वीही ठाण्यात तीन लहान मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा दावा अविनाश जाधव यांनी केला.

अविनाश जाधव आणि मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतच त्या नराधमाला चोपले. त्याला पत्रकार परिषदेत माफी देखील मागायला लावली. ‘नवी मुंबई, मुंबई किंवा ठाणे या तिन्ही शहरांमधील लहान मुलींवर बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी हे उत्तर भारतीय आहेत. हे सत्य असून गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको. अशा किती लोकांना सहन करायचे. जर हे प्रकार थांबवले नाही तर उत्तर भारतीयांना मारुन मारुन इथून बाहेर काढू. उत्तर भारतातून घाण मुंबईत येत आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर मनसेने त्या नराधमास पोलिसांच्या ताब्यात दिले.

बलात्कारसारख्या घटनांना उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा रंग देण्याचा प्रयत्न करत आहात का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘आमचा उद्दीष्ट अशा लोकांना चाप देणं हा आहे. आम्ही बलात्काराच्या घटनांना जातीय रंग देत नाही. ठाण्यात जेवढ्या मोठ्या घटना घडल्या त्यात उत्तर भारतीयच आहेत ही वस्तूस्थिती आहे. अशा लोकांचे चेहरे समोर आलेच पाहिजे. किती दिवस आमच्या मुली हे सहन करणार. किती दिवस या लोकांना माफ करायचे. यांचे कृत्यच घाणेरडे आहेत. हे सगळे एकटे एकटे दोन – दोन वर्ष इथे राहतात. जर हे प्रकार थांबले नाही तर आम्ही मारुन मारुन या लोकांना इथून बाहेर काढू, अशी धमकीच त्यांनी दिली.