आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचार असणाऱ्या पक्षांनी एकत्र आले पाहिजेत. तरच यशाचा मार्ग सुकर होईल. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्ताव ठेवला तर त्यावर वरिष्ठ पातळीवर विचार केला जाईल, असे सूतोवाच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत रविवारी  केले. लोकसभा  निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे ९ जागांवर फटका बसला असल्याचे स्पष्ट करताना विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँगेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेब थोरात यांनी रविवारी साईंच्या दरबारी हजेरी लावत, साईंची पाद्यपूजा केली. या वेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे  नीलेश कोते हे उपस्थित होते. बाळासाहेब थोरात म्हणाले, की राज ठाकरे यांनी घेतलेल्या सर्व सभा यशस्वी झाल्या, मात्र त्याचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही याचा विचार करणेही आवश्यक आहे. तसेच मनसेकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र राज ठाकरे, डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीचा प्रस्ताव ठेवला तर त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

सध्याची राजकीय परिस्थिती खूप गंभीर झाली असून अलीकडच्या काळात लोकशाही तसेच राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांना  सुरुंग लावला जात आहे, यावर मात करण्यासाठी सर्वाना एकत्र घेऊ न लोकशाही चांगली राहावी, यासाठी आमच्या पक्षाचा प्रामाणिक विचार सर्वाच्या अंत:करणात रुजविण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले.

विखेंना चांगले काम करण्याचा सल्ला

खासदार डॉ. सुजय विखे आणि आपला एकत्र विमान प्रवास हा केवळ एक योगायोग होता, या भेटीत  झालेल्या चर्चेची उत्सुकता  समर्थकांना होती. मात्र मी राजकारणात व्यक्तिगत द्वेषाला कधीच स्थान दिले नाही, उलट विजयाबद्दल खासदार सुजय विखेंचे अभिनंदन करून वडीलकीच्या नात्याने त्यांना चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे थोरात यांनी सांगितले.